मुंबई-पुणे Expresswayवर पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद ; पहा पर्यायी मार्ग कोणते?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० फेब्रुवारी ।। मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाची माहिती आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट उद्यापासून ( 11 फेब्रुवारी) तब्बल 6 महिने बंद राहणार आहे. या निर्णयामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना फटका बसणार आहे. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) एक नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बनवत असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. 

नवी मुंबई वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते, हा मार्ग बंद झाल्याने पनवेल, मुंब्रा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या छोट्या वाहनांसह जड वाहतूकीच्या वाहनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.बांधकाम सुरळीत होईपर्यंत पर्यायी मार्ग देण्यात येणार आहेत. मोटार वाहन कायद्याअंतर्गत नवी मुंबईचे पोलिस उपायुक्तांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा मुंबईला जाणारा एक्झिट मार्ग 6 महिन्यांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.(Kalamboli flyover construction)

वाहनचालकांना फटका बसणार पण पर्यायी मार्ग कोणते?
पनवेल एक्झिट बंद राहणार असल्याने लहान आणि मोठी वाहने तसेच मालवाहू ट्रक यांना याचा परिणाम जाणवेल. विशेषतः पनवेल, मुंब्रा आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे (JNPT) जाणाऱ्या वाहनांना फटका बसणार आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग सूचविले आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पनवेल, गोवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा येथे पळस्पे सर्कल मार्गे NH-48 वर वळवली जातील.
पुण्याहून मुंबईकडे येणारी व तलोजा, कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणारी वाहने: रोडपाली आणि NH-48 मार्गे जाऊ शकतील.
वाहनचालकांना महत्वाच्या सूचना
विलंब टाळण्यासाठी वाहनचालकांना सुचवलेल्या मार्गांचे अनुसरण करण्याचा आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे. वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी साइनबोर्ड आणि वाहतूक कर्मचारी तैनात केले जातील. बांधकाम कामाच्या प्रगतीबद्दल प्रवाशांना माहिती देण्यासाठी नियमित अपडेट्स दिले जातील. असे सांगण्यात आले आहे.

वाढत्या वाहनसंख्येमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विस्तारीकरण प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये अतिरिक्त लेन आणि बायपास रस्त्यांचे बांधकाम समाविष्ट आहे. कलंबोली सर्कल येथे सुरू असलेले नवीन उड्डाण पूल आणि अंडरपास प्रकल्पही याचाच भाग आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला 6-लेन आणि पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. तो 94.5 किमी लांब आहे. हा महामार्ग मुंबई आणि पुणे यातील प्रवासाचा वेळ फक्त 2 ते 2.5 तासांवर आला आहे. 2002 मध्ये सुरू झालेल्या या महामार्गामुळे जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-48) वाहनकोंडी बऱ्याचअंशी कमी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *