जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी ; महाकुंभकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १५ तास ट्रॅफिक जाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० फेब्रुवारी ।। उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक संगमात पवित्र स्नान करत आहेत. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे दोन दिवस मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या आहे. संगमला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर १० ते १५ किलोमीटर रस्ते जाम झाले आहे.

वाराणसी, लखनऊ, कानपूर ते प्रयागराज जाणाऱ्या रस्त्यांवर २५ किलोमीटरपर्यंत जाम आहे. दुसरीकडे, प्रयागराज संगम रेल्वे स्थानकाबाहेर जास्त गर्दी असल्याने स्टेशन बंद करण्यात आले आहे. आज प्रयागराजकडे जाणे अशक्य आहे, कारण २००-३०० किलोमीटर वाहतूक कोंडी आहे,” असे पीटीआयच्या वृत्तात पोलिसांनी सांगितले आहे. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंमध्ये मध्य प्रदेशातील कटनी, जबलपूर, मैहर आणि रेवा जिल्ह्यांमधील रस्त्यांवर हजारो कार आणि ट्रकच्या मोठ्या रांगा दिसत आहेत.

प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.५७ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आणि १३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत ४३.५७ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे.

१५ फेब्रुवारीनंतरच प्रयागराजला येण्याचे आवाहन
महाकुंभामध्ये प्रमाणापेक्षा जास्त भाविक आल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. रस्त्यांवर वाहने गेल्या काही तासांपासून रेंगाळत आहेत. संगमात डुबकी मारण्यासाठी जाणारे आणि तिथून परतणारे भाविक कोंडी सुटण्याची वाट पाहत आहेत, अनेकजण गेल्या काही तासापासून वाहनातच बसून आहेत. प्रयागराजला जाण्यासाठी सुमारे ७ मार्ग आहेत. या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी आहे. प्रशासन लोकांना १५ फेब्रुवारीनंतरच प्रयागराजला येण्याचे आवाहन केले आहे. शहराच्या आतही ७ ते ८ किलोमीटर अंतरावर वाहतूक कोंडी आहे.

प्रयागराजच्या बाहेर ५० हजारांहून अधिक वाहने उभी आहेत. पेट्रोल आणि गॅसचाही तुटवडा आहे. संगम रेल्वे स्थानकाबाहेर जास्त गर्दी असल्याने स्टेशन बंद करण्यात आले. रेल्वे स्थानक १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

पोलीस अधिकारी कुलदीप सिंह यांनी सांगितले की, “वाहनांची संख्या खूप जास्त आहे आणि प्रवासी एकमेकांच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी होत आहे. सिंह यांच्या मते, मौनी अमावस्येला जितकी गर्दी आली होती तितकीच गर्दी आता येत आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी, जत्रेच्या जवळील पार्किंग लॉट पहिल्यांदा भरले जात होते आणि नंतर दूरच्या पार्किंग लॉटमध्ये पाठवण्यात येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *