महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १७ ऑगस्ट – जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि करोना संकटावर बड्या अर्थव्यवस्थांचे आर्थिक पॅकेज यामुळे कमॉडिटी बाजार अस्थिर बनला आहे. त्यामुळे सोने आणि चांदीत नफावसुली होताना दिसत आहे. आज सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ३९ रुपयांनी कमी झाला आणि ५२१८८ रुपये झाला. त्याने ५२११३ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. चांदीचा भाव मात्र २७९ रुपयांनी वधारला असून तो एक किलोला ६७४५० रुपये झाला आहे.
रशियाने करोनाप्रतिबंधात्मक लशीचे उत्पादन जोरात सुरु केले आहे. तर इतर देशांचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या निमित्ताने तेजीत आलेले सोने आणि चांदीच्या वाढीला ब्रेक लागला आहे. रशियात करोना लस तयार झाल्याने या महामारीवर नियंत्रण मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे जागतिक कमॉडिटी बाजारातदेखील सोन्याचा दरात मोठी घसरण झाली आहे.