New India Co-operative Bank : तुमच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी… न्यू इंडिया सहकारी बँक ग्राहकांना सोमय्यांचा मेसेज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी ।। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (New India Co-operative Bank) ठेवीदारांवर पैसे काढण्याबाबत निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर ग्राहकांनी बँकेबाहेर मोठी गर्दी केली. आपले पैसे परत मिळणार का, याची काळजी ठेवीदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. परंतु भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ शेअर करत ठेवीदारांना चिंता न करण्याचं आवाहन केलं.

किरीट सोमय्या काय म्हणाले?
न्यू इंडिया सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लागू केले आहेत. मी ठेवीदारांना विनंती करतो, की तुमच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी विम्याअंतर्गत परत मिळतील. ज्यांची सेफ डिपॉझिट लॉकर आहेत, त्यांना आपलं सर्व सामान सुरक्षित परत नेण्याची संधी मिळेल. ज्यांच्यामुळे बँक बुडाली आहे, त्यांच्यावर कारवाई बडगा उगारणार, अशा शब्दात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांना आश्वस्त केले.

न्यू इंडिया सहकारी बँकेवरील निर्बंध कोणते?
१. चालू किंवा बचत खातेधारकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत
२. बँकेला नव्याने कर्जाचे वाटप करता येणार नाही
३. जुन्या कर्जाला मुदतवाढही देता येणार नाही
४. बँकेला कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही
५. ठेवी तारण ठेवून घेतलेलं कर्ज मात्र निल करता येईल
६. बँकेतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित
७. निर्बंधाचा कालावधी १३ फेब्रुवारीपासून सहा महिने
दरम्यान, बँक अधिकारी आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत नसल्याचं काही ग्राहक सांगत होते. तसेच कस्टमर केअर सेवा आणि अॅपही काम करत नसल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.
लॉकरमधील वस्तू नेण्यासाठी टोकन
बँकेबाहेर बहुतांश ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. बँक अधिकाऱ्यांनी ग्राहकांना टोकन दिली आहेत. ग्राहक टोकनचा वापर लॉकरमधील सामान काढण्यासाठी करु शकतात. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *