![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. १५ फेब्रुवारी ।। महाराष्ट्रातील फेब्रुवारी महिना अधिकाधिक उष्ण होत असून, गेल्या १२१ वर्षात या महिन्यातील कमाल तापमान ०.७४ अंश सेल्सिअसने, तर किमान तापमान ०.४४ अंश सेल्सिअसने वाढल्याचे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी नोंदवले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार १९०१ ते २०२२ दरम्यान फेब्रुवारी महिन्यातील तापमान स्थिरपणे वाढत आहे. यावर्षीही हा कल कायम राहण्याची शक्यता असून, महिन्याच्या अखेरीस राज्यातील तापमान ४० अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हिवाळ्याची चाहूल आता जानेवारीपुरतीच मर्यादित राहिली आहे. पूर्वी मार्चअखेरपर्यंत थंडी जाणवत असे, मात्र गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच तापमान मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात थंडी ओसरते आणि फेब्रुवारीच्या मध्यापासून तापमान झपाट्याने वाढत जाते. यंदाही हीच स्थिती असून, सध्या राज्यातील तापमान 36 ते 38 अंशांपर्यंत पोहोचले आहे. पुणे, नागपूर, अकोला आणि परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.
याशिवाय, फेब्रुवारी महिन्याती पर्जन्यमानही घटत असल्याचे हवामान अभ्यासकांचे निरीक्षण आहे. मागील काही दशकांमध्ये या महिन्यात पाऊस कमी होत गेला असून, यंदाही राज्यात फेब्रुवारीत पावसाची शक्यता नाही. परिणामी, उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक तीव्र जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही वर्षांपासून तापमानवाढ आणि हवामानातील बदलांचा प्रभाव महाराष्ट्रावर स्पष्टपणे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यातील वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळ्याची सुरुवात लवकर होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.![]()
