‘GBSची लागण पाण्यामुळं नाही, तर…’; अजित पवारांनी दिली एक नवीन महत्त्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. १६ फेब्रुवारी ।। पुण्यासह राज्यभरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. GBS रुग्णांची एकूण संख्या 208वर आहे. सुरुवातीला पाण्यामुळं हा आजार पसरत असल्याचे बोलले जात होतं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस आजाराबाबत नवी माहिती दिली आहे. जीबीएस आजाराची लागण पाण्यामुळं नव्हे तर कोंबड्यांमुळं होत असल्याचे अजित पवारांनी म्हटलं आहे.

जीबीएस आजार हा पाण्यामुळे होत असल्याचा दावा याआधी केला जात होता. पण या आजाराचं संक्रमण होण्यामागील आणखी एक कारण आता समोर येत आहे. फक्त दुषित पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याची माहिती उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची व्हिल्हेवाट लावायची गरज नाही. फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे अशी महिती त्यांनी दिली.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
आपल्याला वाटलं की पाण्यामुळं या आजाराची लागण झाली. पण खडकवासला परिसरातील काहींचं म्हणणं आहे की, कोंबड्यांमुळे या आजाराची लागण झाली. त्याबाबत अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसले यांना प्रेसनोट काढायला सांगणार आहे. तिथल्या कोंबड्यांची व्हिल्हेवाट लावायची गरज नाही. फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुण्यात आणखी एका रुग्णाला GBSची लागण
पुणे शहरात रोज जीबीएस बाधित रुग्णसंख्या वाढत असून रविवारी तपासणी होत नसल्यामुळे बाधित रुग्णसंख्या कमी दिसते. आत्तापर्यंत 124 GBS बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज नव्याने एक रुग्ण सापडला. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या 208 वर पोहोचली असून त्यातील 181 रूग्णांना जीबीएसचं निदान झालंय. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहेत.

GBS बाधित गावांना लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा
पुणे महापालिकेत समाविष्ट 34 पैकी 12 गावांमध्ये शुद्ध न केलेले पाणी थेट धरणातून दिले जाते. यातील किरकटवाडी, नांदेड गाव, धायरी, नांदोशी या गावांमध्ये जीबीएस रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे भविष्यात अशुद्ध पाण्यापासून होणाऱ्या साथीच्या आजारांना अटकाव घालण्यासाठी 12 गावांना आता शुद्ध पाणी दिले जाणार आहे. प्रत्येकी 100 एमएलडी क्षमता असलेले दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत, यासाठी 890 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, हे काम 2 टप्प्यांत केले जाणार असल्याने महापालिकेकडून पहिल्या टप्यातील कामासाठी शासनाकडे 606 कोटींच्या निधीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *