महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १७ फेब्रुवारी ।। शहरात उन्हाचा चटका वाढल्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्येच मे महिन्याचा अनुभव पुणेकरांना होतो आहे. उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत असल्याने डोके आणि चेहऱ्याला वाचवण्यासाठी टोपी, स्कार्फ अथवा रुमालचा वापर नागरिकांकडून केला जातोय, तर तरुणीही घरातून बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने चेहरा झाकून घराबाहेर पडताना दिसत आहेत. हे पाहता ‘तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो…’ या भावगीताची आठवण होते.
मागील काही दिवसांपासून थंडीने काढता पाय घेतल्याने शहरामध्ये उन्हाचे चटके वाढू लागले आहेत. दिवसा उकाडा, तर रात्री थंडी असे सध्याचे वातावरण आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहर व परिसरामध्ये उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे.
उन्हामुळे दुचाकीस्वारांना घामाच्या धारा लागत आहेत, तर उन्हाच्या तडाख्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने रसवंतीगृह व गुऱ्हाळावरील घुंगरांचा आवाज कानी पडू लागला आहे. शहरात ठिकठिकाणी रसवंतीची दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे थंडगार उसाचा रस पिण्यासाठी प्रवासी व नागरिकांची पावले आपोआप पेयाकडे वळू लागली आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. उष्णतेच्या पाऱ्याने सध्या ३७ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही आता नागरिकांना असह्य होऊ लागले आहे.
त्यामुळे शीतपेयाला मागणी वाढली आहे. यामध्ये उसाचा रस आणि नारळपाणी पिण्यासाठीही नागरिकांची गर्दी होत आहे. लिंबू, आलेयुक्त उसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होत असल्याने ताज्या रसाला अधिक मागणी आहे.
एसी, कूलरला मागणी वाढली…
उन्हाच्या झळा वाढल्यामुळे एसी आणि कूलरच्या मागणीमध्येही वाढ झाली असल्याचे इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्या व्यापाऱ्यांनी सांगितले, तर कूलर किंवा एसीची किंमत न परवडणाऱ्या सर्वसामान्यांची पाऊले पंखे खरेदीकडे वळत आहेत. कूलरप्रमाणे पंख्यांची मागणीही वाढू लागली आहे.