महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. १८ फेब्रुवारी ।। महिला प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान अंपायरने ३ निर्णय चुकीचे दिले होते. दरम्यान या वादग्रस्त निर्णयानंतर नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यानंतर हे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणते आहेत ते नियम? जाणून घ्या.
Espncricinfo नुसार, महिला प्रीमियर लीग स्पर्धा खेळत असलेल्या सर्व संघांना सांगण्यात आलंय की, अंपायर धावबाद तेव्हाच गृहीत धरणार जेव्हा बेल्स स्टम्पपासून पूर्णपणे वेगळी होईल. कारण यापूर्वी चेंडू बेल्सची लाईट पेटताच बाद घोषित केलं जायचं.
महिला प्रीमियर लीग स्पर्धेत एलइडी स्टम्पचा वापर केला जातो. या स्पर्धेतील नियमानुसार, पहिल्या फ्रेममध्ये फक्त स्टम्प आणि बेल्सची एलइडी पेटत असताना दाखवले जातात. तर दुसऱ्या फ्रेममध्ये बेल्स स्टम्पपासून वेगळे होत असल्याचं दाखवलं जातं.
नियम बदलण्यामागचं नेमकं कारण काय?
माध्यमातील वृत्तानुसार, हा नियम एलइडी बेल्समुळेच बदलण्यात आला आहे. कारण जरा संपर्क झाला की, झिंग बेल्सची लाईट पेटते. त्यामुळेच तिसऱ्या अंपायरने नियम बदलण्याच्या आधारावर हा निर्णय दिला होता. दरम्यान सामन्याच्या एक दिवसानंतर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली होती.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना, मुंबई इंडियन्सने १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने ८ गडी बाद १६५ धावा करत २ गडी राखून विजय मिळवला.
