महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – बंगळुरू – दि. १८ ऑगस्ट – टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणारे अवलिया बर्याच ठिकाणी पाहिले असतील. अशाच एका बंगळुरु येथील अवलियाच्या कामगिरीवर ‘महाराष्ट्र २४’ ने टाकलेला प्रकाशझोत… बंगळुरु येथील श्रीनिवासुलु एम. आर या अवलियाने सुमारे १५०० च्या पेक्षा जास्त पेनच्या रिफिलद्वारे अमृतसर सुवर्ण मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. या कामगिरीसाठी त्याला २ वर्षे ४ महिन्यांचा कालावधी लागला. त्याच्या या कामगिरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्याच्या या कलाकुसरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्लास्टिकच्या साहित्याविषयी आणि त्यांच्या घातक परिणामांविषयी तसेच प्लास्टिकचा पुनर्वापर याविषयी श्रीनिवासुलू एम. आर. जनजागृती करत असल्याची माहिती त्याने ‘महाराष्ट्र २४’ ल दिली.
कलावंत असलेल्या श्रीनिवासुलू हा शास्त्रीय नर्तक (भरतनाट्यम, कुचीपुडी आणि यक्षगाना), त्याचप्रमाणे खडू व वाळूपासून शिल्प तयार करणारा शिल्पकार आहे. आणि आता त्याच्या या भन्नाट कलेचे सादरीकरण करत असताना पेन रिफिलमधून प्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती बनवतो. त्याने या पूर्वी अनेक कलाकुसरींचे वर्ल्ड रेकॉडही केले आहे. त्याचसोबत तो पर्यावरणवादी आणि अभियंता आहे.
त्याच्या या कलाकुसरीविषयी सांगताना तो म्हणाला की, मित्रांकडून वापरलेली पेन रिफिल जमा करण्याचा छंद त्याला होता. श्रीनिवासुलू याला आर्किटेक्ट व्हायचे होते, परंतु पालकांच्या सल्ल्यानुसार त्याने संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला होता. काही वर्षांनंतर त्याने आर्किटेक्चरकडे पाहण्याची आवड कायम जोपासण्याचा निर्णय घेतला आणि त्याने वर्षानुवर्षे गोळा केलेल्या पेन रिफाईल्सचा संग्रह पुन्हा एकदा बाहेर काढला. त्यातून काहीतरी तयार करण्याचा निर्णय घेतला. ‘से टू टू प्लॅस्टिक’ या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, ज्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ग्लोबल वार्मिंगविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्या ठिकाणी त्याने आपला सहभाग नोंदविला.
२००७ मध्ये, वापरलेल्या पेन रिफिलमधून त्याने ‘आयफेल टॉवर’ ची प्रतिकृती तयार करण्यास सुरुवात केली. आयफेल टॉवर प्रतिकृती निर्मितीसाठी श्रीनिवासुलू याला २०० पेन रिफिल्स व सुमारे ८ महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर त्याच्या विविध वास्तूंच्या निर्मितीचा वेग वाढला. चारमीनार, बिग-बेन क्लॉक, ताजमहाल, लीसा टॉवर ऑफ पिसा, गेट वे ऑफ इंडिया, सिएटल स्पेस सुई, सिडनी हार्बर ब्रिज, सेंट फिलोमेना चर्च, मैसूर, आदी वास्तूंच्या प्रतिकृती श्रीनिवासुलूने रिफिलद्वारे साकारल्या आहेत.