महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. १८ ऑगस्ट – नवी दिल्ली – सोमवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली असून यासंदर्भातील माहिती एम्स रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. अमित शहा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. पण उपचारानंतर नुकतीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
दरम्यान काल रात्री एम्स रुग्णालयात अमित शहा यांना दाखल करण्यात आले असून एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरीया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अमित शहा यांची प्रकृती ठिक असून ते रुग्णालयातून आपले काम पाहणार असल्याची माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
