महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ फेब्रुवारी ।। ॲशेस मालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकणारे दोन देश चॅम्पियन्स करंडकातील ब गटातील साखळी फेरीच्या लढतीत आमने-सामने येणार आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेत सुमार कामगिरी करणारा अन् सुमार फॉर्ममधून जाणारा इंग्लंडचा संघ दुखापतीमुळे प्रमुख खेळाडूंना मुकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाशी दोन हात करणार आहे.
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन्ही देशांना मागील काही एकदिवसीय सामन्यांमध्ये निराशेला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियन संघाला श्रीलंकन संघाकडून ०-२ आणि पाकिस्तानकडून २-१ अशी हार पत्करावी लागली आहे. तसेच २०२३ मधील एकदिवसीय विश्वकरंडकानंतर इंग्लंडच्या संघाला एकही एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. ब्रँडन मॅक्कलम यांच्या मार्गदर्शनाखाली व जॉस बटलर याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाची भारताविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांमध्ये पार पडलेल्या मागील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-२ असे यश मिळवले होते, पण या निकालाचा उद्या होत असलेल्या लढतीवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण दोन्ही संघांमध्ये बदल झालेला आहे.
प्रमुख खेळाडू नसल्याचा फटका
ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन्स करंडकात स्टीव स्मिथ याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. पॅट कमिंस, जॉश हॅझलवूड व मिचेल स्टार्क या प्रमुख वेगवान गोलंदाजांनी माघार घेतली आहे. मिचेल मार्श, कॅमेरुन ग्रीन हे खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकलेले नाहीत. मार्कस स्टॉयनिस याने अचानकपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. हे सर्व क्रिकेटपटू अनुभवी असल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला याचा फटका चॅम्पियन्स करंडकात बसू शकणार आहे. स्टीव स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल व ॲडम झाम्पा या अनुभवी खेळाडूंना ऑस्ट्रेलियन संघासाठी मोलाची कामगिरी करावी लागणार आहे.
नव्या दमाने मैदानात उतरणार
इंग्लंडचा अनुभवी फिरकी गोलंदाज अदिल राशीद याने याप्रसंगी आपले मत व्यक्त केले की, भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, पण आमच्या संघातील खेळाडूंमध्ये अफाट गुणवत्ता आहे. या संघामध्ये मॅचविनरही आहेत. नव्या दमाने आम्ही मैदानात उतरू.
फलंदाजीचा कणा ज्यो रूट
इंग्लंडच्या फलंदाजीची मदार ज्यो रूटवर असणार आहे. तोच फलंदाजीचा कणा असेल. बेन डकेट, फिल सॉल्टची आक्रमक फलंदाजीही या वेळी महत्त्वाची ठरू शकणार आहे. तसेच जोफ्रा आर्चर, मार्क वूड, ब्रायडन कार्स व अदिल राशीद या चार खेळाडूंना गोलंदाजीत चमक दाखवावी लागणार आहे.
