महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ फेब्रुवारी ।। महाशिवरात्री असल्याने शिवालयांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. दोन दिवसांवर महाशिवरात्री असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर आजपासुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी ४८ तास खुले राहणार आहे. यामुळे भाविकांना दर्शन घेणे सोयीचे होणार आहे.
महाशिवरात्री उद्या साजरी होत आहे. या निमित्ताने महादेवाची मंदिर सजावटीचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार भीमाशंकर मंदिरात देखील तयारी सुरु असून महाशिवरात्रीनिमित्ताने आज पहाटेची महाआरती दुग्धाभिषेक झाल्यानंतर मुख्य शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. तर आज रात्री १२ वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकिय पुजा पार पडणार असुन दोन दिवस दिवसरात्र मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे.
गर्दी अधिक वाढण्याची शक्यता
महाशिवरात्री निमित्ताने दोन दिवस भाविकांना भीमाशंकराचे दर्शन घेता येणार आहे. यंदा प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यात अनेक भाविक जाऊन आले आहे. येथे सहभागी झालेले भाविक बारा ज्योतिर्लिंग यात्रा करत असतात. त्यामुळे महाशिवरात्रीला भिमाशंकरला गर्दी होणार असल्याने भिमाशंकर देवस्थानकडून भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
सालबर्डी, कोंडेश्वरकरिता ९५० बसफेऱ्या
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी, कोंडेश्वर येथे जाण्यासाठी भाविकांसाठी ९५० पेक्षा अधिक बसफेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविकांच्या सुविधा करिता एसटी महामंडळ प्रशासन सज्ज झाले असून २३ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान या बस धावणार आहेत. प्रत्येक बस स्थानकावरून दहा बसचे नियोजन आहे. या दरम्यान महिलांना प्रवासात ५० टक्के सूट सवलत लागू असणार आहे.