महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ फेब्रुवारी ।। तुमच्या वाहनावर आता थेट एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानयुक्त कॅमेर्यांद्वारे नजर असणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे डबल पार्किंग करून थांबण्याच्या वेळेची नोंद घेऊन मिनिटभरापेक्षा जास्त वेळ थांबणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाईही होणार आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत करून तिचा वेग वाढविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता आर्टिफिशिअल इंजेलिजेन्सची (एआय) मदत घ्यायचे ठरविले आहे. त्याअंतर्गत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर येत्या 1 मार्चपासून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
मुख्य रस्त्याच्या एखाद्या लेनमध्ये एक गाडी पाच मिनिटे थांबून राहिली, तर तासाला पाचशे गाड्यांच्या वेगावर विपरीत परिणाम होतो, हे वाहतूक व्यवस्थापनाच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहतूक अडवून धरणार्या अशा वाहनांना अटकाव घालण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार्या या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.
या प्रकल्पांतर्गत रस्त्यावर डबल पार्किंग करून थांबणार्या वाहनांवर एआय तंत्रज्ञानयुक्त कॅमेर्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. एक मिनिटापेक्षा अधिक वेळ थांबलेल्या वाहनांची नोंद घेऊन स्वयंचलित पद्धतीने त्यांना दंडाचे चलनही पाठविले जाणार आहे. त्यामुळे अनेक सबबी देत वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे यापुढे चांगलेच महागात पडणार आहे.
रस्त्याकडेच्या पार्किंग एरियात थांबलेल्या गाडीशेजारी डबल पार्किंग करून थांबणे हा वाहतूक नियमांनुसार दंडनीय गुन्हा आहे. अशा पहिल्या गुन्ह्यासाठी पाचशे रुपये, तर दुसर्या गुन्ह्यासाठी दीड हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
आता तर एआययुक्त कॅमेर्यांकडेच त्याचे नियंत्रण जाणार असल्याने वाहनधारकांना यापुढे अशा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक पोलिस व बेशिस्त वाहनचालकांमध्ये होणारे शाब्दिक वादही आपोआपच टळतील, असे वाहतूक विभागाची जबाबदारी असलेले अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, बेशिस्त वाहनचालक त्यात मोठी भर घालतात, असे अनेक बाबींमधून स्पष्ट झाले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था भक्कम करणे, पीएमपीएमल, मेट्रो अशा वाहतूक साधनांचा अधिकाधिक वापर करणे, उड्डाण पूल, रस्तारुंदीकरणे करणे, पायाभूत सुविधांची गरज आहे. परंतु, या सुविधा उभारण्यासाठी पुढील 7-8 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे कमी खर्चाच्या वाहतूक व्यवस्थापन तंत्राचा वापर करून शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे.
त्यासाठी वाहतूक पोलिस, मनपा प्रशासन, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट, पीएमपीएमएल, मेट्रो, महावितरण, गॅस अॅथॉरिटी अशा सर्व संबंधित संस्था एकत्र आल्या असून, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून या समस्येवर मार्ग काढण्यास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती (सरफेसिंग) करण्यात येत असून, 33 प्रमुख रस्त्यांपैकी 15 प्रमुख रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित 17 रस्त्यांचे काम सुरू आहे.
रस्तेदुरुस्ती, खड्डे दुरुस्त करणे, ड्रेनेजच्या चेंबरची झाकणे समपातळीत घेणे, पावसाळी पाण्याच्या निचर्याची व्यवस्था करणे, पाणी साठून राहणार्या ठिकाणांची दुरुस्ती करणे आणि रस्त्यांचा पृष्ठभाग ठीक करणे, अशी कामे करण्यात येत आहेत. रस्त्यावरील पथारी व्यावसायिक व अतिक्रमणांमुळेही वाहतुकीचा वेग मंदावतो. हे अडथळेही दूर करण्यावर भर देण्यात आला आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली.
…तर शहरातील सर्वच रस्ते ‘एआय’च्या निगराणीखाली
फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प यशस्वी झाला, तर शहरातील अन्य प्रमुख रस्त्यांवरही त्याचे अनुकरण करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.