राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ फेब्रुवारी ।। महायुती सरकारने राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांना होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठी भेट देताना महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला असून, याची अंमलबजावणी जुलै 2024 पासून केली जाणार आहे. सोबतच सात महिन्यांच्या फरकाची रक्कम कर्मचार्‍यांना फेब्रुवारीच्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार असल्याने कर्मचार्‍यांसाठी हा दुहेरी लाभ ठरणार आहे.

वित्त विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्‍यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात एक जुलै 2024 पासून सुधारण करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा वाढीव महागाई भत्ता एक जुलै 2024 पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे एक जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या सात महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी 2025 च्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयावर सरकारी कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

केंद्राच्या पार्श्वभूमीवर निर्णय
केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महागाई भत्त्यातील वाढीचा हा निर्णय घेतला. या निर्णयाचा राज्यातील एकूण 17 लाख शासकीय कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे. एखाद्या कर्मचार्‍याचा 40 हजार रुपये मूळ पगार असेल तर 3 टक्के वाढीव भत्त्यासह दरमहा 1200 रुपये अतिरिक्त महागाई भत्ता मिळण्यास सुरुवात होईल. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये होळी सणाच्या आधीच राज्य कर्मचार्‍यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली आहे.

कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण
राज्यात विधानसभा निवडणूक होऊन नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर नव्या वर्षात तरी प्रलंबित असलेला महागाई भत्ता सरकार घोषित करेल, अशी सरकारी कर्मचार्‍यांची अपेक्षा होती. मात्र, हा निर्णय न झाल्यामुळे राज्यातील 17 लाख राज्य व जिल्हा परिषदेचे कर्मचार्‍यांमध्ये नाराजीची भावना पसरली होती. ज्या कर्मचार्‍यांनी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली तेच कर्मचारी आर्थिक अधिकारापासून वंचित आहेत, असा आरोपही होत होता. अखेर शासनाने महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केल्याने कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *