Maharashtra Weather: राज्यातील शहरं उष्णतेनं तापली ! येत्या 3 दिवसांत IMD चा अंदाज काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ फेब्रुवारी ।। महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात सध्या प्रचंड तापमान आणि दमटपणा वाढलाय. मुंबईसह कोकणातील शहरं तापली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यातच या शहरांमध्ये 38 अंश सेल्सियसवर तापमान गेलंय. उष्णतेची धग प्रचंड वाढलीय. नागरिक उन्हाच्या चटक्याने हैराण झाले आहेत. बुधवारी बहुतांश महाराष्ट्रात तापमान प्रचंड वाढलेले होते. मराठवाडा विदर्भात चांगलीच रखरख वाढलीय. मध्य महाराष्ट्रातही सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होतेय.दरम्यान, येत्या तीन दिवसात राज्यातील अंतर्गत भागात 2-3 अंशांनी तापमान वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय. (IMD Forecast)

हवामान विभागाचा इशारा काय?
राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून कोकण गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसून मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात येत्या 24 तासांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. कोकण गोवा, मुंबई भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ही तापमानस्थिती कायम राहणार आहे. राज्याच्या उर्वरित भागात सध्या कोरडे व शुष्क हवामान असून प्रचंड तापमान वाढलं आहे. (Heat Wave)

कुठे किती तापमानाच्या नोंदी?
बुधवार (दि26 फेब्रुवारी) राज्यात पुणे आणि कोल्हापूर विभागात कोरडे हवामान होते. पुण्यात शिवाजीनगर येथे 36.2°C तर लोणावळ्यात 37.6°C तापमान नोंदले गेले. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल तापमान 27.6°C होते. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये तापमान 32°C ते 35°C दरम्यान होते.नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत उन्हाचा चटका जाणवत होता. नंदुरबारच्या शाहादा येथे सर्वाधिक 39.9°C तापमान नोंदले गेले. धुळ्यात 36.5°C तर जळगाव व नाशिकमध्येही 33°C ते 36°C तापमान राहिले.मराठवाड्यातील बहुतांश भागांत तापमान 33°C ते 37°C दरम्यान होते. लातूरमध्ये 36.1°C, नांदेडमध्ये 34.9°C तर जालन्यात 33.5°C तापमान नोंदवले गेले. विदर्भात उन्हाचा प्रभाव जाणवत होता. चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे कमाल तापमान 33°C ते 36°C दरम्यान होते. चंद्रपूरच्या तोंडापूर येथे 36.3°C तर वर्ध्यात 35.5°C तापमानाची नोंद झाली. आकाश निरभ्र असल्यामुळे उन्हाचा कडाका जाणवत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *