महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी ।। इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणार्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या सोडतीत निवड झालेल्यांपैकी गुरुवारीअखेरपर्यंत 36 हजार 731 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.
प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत असून, प्रवेशासाठी केवळ शुक्रवार (दि. 28) दिवस उरला आहे. परंतु, अपेक्षित प्रवेश न झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.
आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्वयं अर्थसाहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिकेच्या स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदा प्रवेशासाठी 1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. प्रवेशासाठीच्या प्रतीक्षा यादीत 85 हजार 406 विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. 28) प्रवेशासाठी शेवटचा दिवस आहे.
निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन तसेच मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिनमधून घेऊन पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. परंतु, प्रवेश जाहीर होऊनही अद्याप प्रवेश घेण्यासाठी पालकांना अडचणी येत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात पाच हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश
पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 960 शाळांमध्ये 18 हजार 498 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 61 हजार 573 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी 18 हजार 161 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. यातून आत्तापर्यंत 5 हजार 263 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूण शाळा: 8863
असलेल्या जागा: 109087
बालकांचे अर्ज: 305152
सोडतीमधून प्रवेश: 101967
गुरुवारपर्यंतचे प्रवेश: 36731