महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मार्च ।। ‘सरकारमध्ये डावलले जात असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थपणातूनच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २२ फेब्रुवारी रोजी पहाटे पुण्यात भेट घेतली. सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिली नाही. मी घेतलेले निर्णय बदलले जात आहेत,” अशी तक्रार करत मुख्यमंत्री पदाची मागणी केली. यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, तुम्ही भाजपमध्ये विलीन व्हा, यानंतर तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी दावा करू शकता, असे अमित शहा यांनी सांगितले, असा धक्कादायक दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामनातील रोखठोक सदरातून खासदार संजय राऊत यांनी हा दावा केला आहे. “उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला. स्वाभिमानासाठी उठाव केल्याचे त्यांनी सांगितले; पण शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले आहे. एकनाथ शिंदे शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील हॉटेलात त्यांची भेट झाली,” असा दावा खासदार राऊत यांनी केला आहे. “५७ आमदारांचे नेते अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागे होते. सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत, असे सांगण्यासाठी शिंदे अमित शहांना भेटले. गृहमंत्री शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता,” असा दावाही राऊत यांनी केला आहे.
अमित शहा काय म्हणाले?
‘सामना’त खासदार राऊत यांनी लिहिले आहे की, एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार करताना मला संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले. तुमच्या विश्वासाने आम्ही तुमच्यासोबत आलो. निवडणुकीनंतरही मी मुख्यमंत्री राहीन, असे तुमचे वचन होते, असेही त्यांनी सांगितले. यावर गृहमंत्री शहा यांनी आमचे १२५ लोक निवडून आले, मग तुम्ही कसा काय दावा करू शकता? असे सांगितले. तुम्हाला काय हवे आहे ते सांगा. मी प्रयत्न करेन, असे शिंदे यांना विचारले. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली असता मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, तुम्ही भाजपमध्ये विलीन व्हावे. तेव्हा तुमचा मुख्यमंत्रीपदावरील दावा कायम राहील. आता बाहेरचा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही. आम्ही तुमचा आदर राखला आहे, असे शहा यांनी शिंदे यांना सांगितले, असेही खासदार राऊत यांनी ‘सामना’त म्हटलं आहे.