Champions Trophy 2025: एकट्या भारतासाठी सर्व देशांचा दुबई प्रवास; सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी थेट ICC ला विचारला जाब!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. ३ मार्च ।। यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक आणि सामन्यांचं ठिकाण चर्चेत आणि प्रसंगी वादात आल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानकडे असताना भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात येत आहेत. त्यामुळे ज्या देशांचे भारताशी सामने आहेत, त्या देशांच्या संघांना सातत्याने पाकिस्तान ते दुबई आणि पुन्हा दुबईहून परत पाकिस्तान असा प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजचे महान माजी क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी थेट ICCला जाब विचारला आहे.

“मला यासंदर्भाल्या राजकीय गोष्टींमध्ये पडायचं नाहीये. पण या सगळ्या स्पर्धांचं आयोजन ICC कडे आहे. त्यामुळे त्यांनी यावर उत्तर द्यायला हवं”, असं सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी म्हटलं आहे.

टीम इंडिया दुबईत, इतर देशांची ये-जा!
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. या गटातील तिन्ही सामने आता झाले असून हे तिन्ही सामने टीम इंडियानं दुबईतच खेळले आहेत. पण त्यासाठी बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या तिन्ही संघांना पाकिस्तानातून दुबईला यावं लागलं आणि नंतर पुन्हा पाकिस्तानला जावं लागलं. भारत विरुद्ध न्यूझीलंड या रविवारी झालेल्या सामन्याआधी तर ब गटात भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका खेळणार की ऑस्ट्रेलिया हे निश्चित नसल्यामुळे हे दोन्ही संघ दुबईत डेरेदाखल झाले होते. आता भारतानं न्यूझीलंडला नमवल्यामुळे अ गटा भारत पहिल्या स्थानी असून ऑस्ट्रेलियाशी भारताचा सामना होणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे न्यूझीलंड आणि द. आफ्रिका या दोन्ही संघांना त्यांच्या सेमीफायनल सामन्यासाठी पुन्हा पाकिस्तानला जावं लागलं आहे.

“या सगळ्या वेळापत्रकावर जर कुणी आक्षेप घेत असेल, तर त्यात नक्कीच मुद्दा आहे. मला वाटतं हे सगळं राजकारणामुळे घडतंय. मला त्या राजकारणात पडायचं नाही. पण माझा ठाम विश्वास आहे की या सगळ्याची जबाबदारी असणाऱ्या ICC ची ही खरी समस्या आहे. माझी इच्छा आहे की यावर त्यांनी उत्तर द्यायला हवं. जर क्रिकेटसंदर्भात त्यांनाच अंतिम अधिकार असतील, तर मग सध्या हे सगळं का घडतंय? माझा ठाम विश्वास आहे की जर आपल्या सगळ्यांना कुठली गोष्ट एकत्र आणू शकत असेल, अगदी शत्रूंनाही तर ते म्हणजे खेळ”, अशा शब्दांत व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

…तर अंतिम सामन्यासाठी पुन्हा दुबई वारी!
४ मार्च रोजी सेमीफायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ दुबईत दाखल झाला आहे. या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यास अंतिम सामना खेळण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजयी संघाला पुन्हा दुबईला जावं लागणार आहे. याआधी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू नासर हुसेन व मायकल अॅथरटन यांनीही “भारतीय संघाला इतर ठिकाणी प्रवास करावा न लागण्याचा फायदा होतोय”, अशी टिप्पणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *