महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. ३ मार्च ।। मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी लवकरच पार्किंग धोरण आणण्यात येणार आहे. त्यात मुंबईकरांना नवे वाहन खरेदी करताना पार्किंग असणे आवश्यक आहे; परंतु त्यासोबत भाड्याने राहणाऱ्यांनाही नवीन वाहन खरेदी करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, या वेळी परिवहन विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या फेसलेस सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते रविवारी (ता. २) मुंबईत परिवहन भवनाचे भूमिपूजन झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘परिवहन विभागाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, स्वयंचलित चालक चाचणी केंद्र, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. परिवहन विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.’’
सीमा तपासणी नाके बंद व्हावेत!
देशभरात जीएसटी लागू असल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचे महत्त्व कमी झाले आहे. भविष्यात व्यापार वृद्धीसाठी आणि मालवाहतुकीला चालना देण्यासाठी राज्यातील सर्व सीमा तपासणी नाके बंद करणे अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे परिवहन विभागाने १५ एप्रिलपर्यंत या संदर्भातील सर्व प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.