महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ ऑगस्ट – नवीदिल्ली – उत्तर कोरियामध्ये करोनाबरोबरच आणखीन एक संकट सर्व सामान्यांना त्रासदायक ठरत आहे. करोनाबरोबरच आता देशामध्ये अन्नधान्याची कमतरता जाणवू लागली आहे. याच संकटाला तोंड देण्यासाठी उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी अन्नधान्य विकत घेणे किंवा शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्याऐवजी कुत्र्यांना ठार करण्याचे आदेश दिले आहेत. किम यांच्या या आदेशानंतर कुत्रे पाळणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जुलै महिन्यामध्ये किम यांनी कुत्रा पाळण्यावर कायदेशी बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केली होती. कुत्रा पाळणे हे भांडवदारी विचारसरणीचे लक्षण आहे असं किम यांनी म्हटलं होतं. दक्षिण कोरियामधील चोसुन इल्बो या वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्तांकन केलं असून किम यांच्या आदेशानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्या घरांमध्ये कुत्रे पाळण्यात आले आहेत त्याची चाचपणी करण्यास सुरुवात केल्याचेही म्हटले आहे. हे सर्व कुत्रे जप्त करुन त्यांना सरकारी प्राणीसंग्रहालयामध्ये ठेवण्यात येईल आणि नंतर हे कुत्रे मांस विक्री करणाऱ्या हॉटेलला विकली जातील असं सांगण्यात येत आहे.
कोरियामध्ये कुत्र्याचे मांस लोकप्रिय आहे. दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. असं असलं तरी मांसांसाठी वर्षाला १० लाख कुत्र्यांचा बळी दिला जातो. उत्तर कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाणाऱ्यांची संख्या दक्षिण कोरियापेक्षा अधिक आहे. प्योंगयांगमध्ये तर कुत्र्याचे मांस मिळणारी विशेष हॉटेल्स आहेत. उन्हाळ्यामध्ये कुत्र्याचे मांस खाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते. कुत्र्याचे मांस खालल्याने शरीरामधील ताकद वाढते आणि शारीरिक क्षमाही वाढते असं सांगण्यात येतं. हिवाळ्यामध्ये कोरियात भाज्यांबरोबर कुत्र्याच्या मांसाचे सूप प्यायले जाते. थंडीमध्ये शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी कुत्र्याच्या मांसांचे सूप प्यायले जाते. प्राणीमित्रांनी किम यांचा हा आदेश चुकीचा असल्याचे मत मांडण्यास सुरुवात केली आहे. मात्र येथील एकाधिकारशाहीमुळे उघडपणे कोणीही या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीय. त्यामुळेच या आदेशांची अंमलबाजवणी करण्याशिवाय प्राणीमित्रांकडे इतर पर्याय उपलब्ध नाहीय.