मस्ती आलीय, मारा त्याला! गजा मारणेने मारहाणीसाठी चिथावणी दिलीच नाही, मोहोळांच्या निकटवर्तीयाने पुणे पोलिसांचा दावाच खोडला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ४ मार्च ।। मारणे टोळीच्या सराईत गुंडांकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय आणि आयटी कर्मचारी देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’ आला आहे. आपल्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना कोणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्रच तक्रारदार आयटी कर्मचाऱ्याने सोमवारी विशेष न्यायालयात सादर केले.

पीडित तरुणाचे प्रतिज्ञापत्र
‘मस्ती आली आहे, साल्याला मारा,’ अशा शब्दांत या तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना कुख्यात गजानन मारणे याने चिथावणी दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला होता. मात्र, मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त कोणीही घटनास्थळी हजर नव्हते; आरोपींनी कोणाच्याही सांगण्यावरून मला मारहाण केली नाही, असे तक्रारदार तरुणाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण?
कोथरूड परिसरातील भेलकेनगर येथे मारणे टोळीतील काही सराईतांनी देवेंद्र जोग नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन पुणे पोलिसांनी गजानन मारणे याच्यासह रूपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली, तर रूपेश मारणे आणि बाब्या पवार या आरोपींचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर गजानन मारणे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. गजानन मारणे याने साथीदारांना तक्रारदार तरुणाला भर चौकात जीवे मारण्यासाठी चिथावणी दिली, असा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी आरोपी गजानन मारणेला तीन मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती.

दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा आरोपींना पोलिसांनी प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात घेतले. मारणेच्या कोठडीची मुदतही संपली. त्यामुळे चौघांनाही पोलिसांनी विशेष न्यायालयात हजर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *