महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. ५ मार्च ।। पुण्यामध्ये अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक भागातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून नागरिकांचे हाल होत आहे. काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा करण्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ एक ते दीड तासाने कमी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करण्याच्या वेळमध्ये बदल करण्यात आला आहे. तर अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पुण्यातील कर्वे नगर, एरंडवणे, गोखले नगर, विद्यापीठ परिसर, बिबवेवाडी आणि शिवाजी नगर या भागात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत.