महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. ६ मार्च ।। बांगलादेशचा अनुभवी खेळाडू मुशफिकर रहीमने बुधवारी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मुशफिरकरने बांगलादेशचे २७४ वन डे सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धची मॅच त्याची शेवटची वन डे मॅच ठरली. त्याआधी भारताविरुद्धच्या लढतीत त्याला भोपळाही फोडता आला नव्हता.
बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून विजय न मिळवताच बाहेर पडला. मुशफिकरने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. त्याने लिहीले की, शेवटचे काही आठवडे आव्हानात्मक होते.मी आजपासून वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे.
“जागतिक स्तरावर माझे यश मर्यादित असले तरी, एक गोष्ट निश्चित आहे, की जेव्हा जेव्हा मी माझ्या देशासाठी मैदानात उतरलो तेव्हा मी समर्पण आणि प्रामाणिकपणाने १००% पेक्षा जास्त दिले,” असे त्याने म्हटले.
मुशफिकुरने २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतरच्या वर्षी २००६ मध्ये त्याचे वन डेत पदार्पण झाले. त्याने २००७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ५६* धावांची शानदार खेळी केली आणि त्याच्या या खेळीमुळे भारताची हार झाली होती. भारताविरुद्ध त्याची कामगिरी नेहमी चांगली राहिली आहे. त्याने भारताविरुद्ध २१ वन डे सामन्यांत ७०० हून अधिक धावा केल्या आहेत.
मुशफिकरने वन डे फॉरमॅटमध्येसंघाचे नेतृत्वही केले. त्याने त्याच्या २७४ सामन्यांच्या कारकिर्दीत ७७९५ धावा केल्या, ज्यामध्ये नऊ शतके आणि ४९ अर्धशतके आहेत. तो म्हणाला, “गेले काही आठवडे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते आणि मला आता जाणवले आहे की हेच माझे नशीब आहे. गेल्या १९ वर्षांपासून ज्यांच्यासाठी मी क्रिकेट खेळलो आहे, त्या माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो.”