महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. ६ मार्च ।। संगमेश्वर येथे ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले, त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे यथोचित स्मारक उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. सोबतच, कर्नाटकातील होदिगेरी येथील शहाजी महाराजांच्या समाधी परिसराची डागडुजी करून त्या ठिकाणाचा विकास करण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंती करण्यात येणार आहे. त्यांना ते शक्य नसल्यास महाराष्ट्र शासन स्वतः सुशोभीकरण करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
या चर्चेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना जेथे शेवटची अटक झाली तो सरदेसाई वाडा सरकारने ताब्यात घेऊन त्यांच्या जीवनावर आधारित काही करावे, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची जागा कमी पडत असल्यास या स्मारकासाठी नजीकची आणखी काही जमीन अधिग्रहीत करण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक, शूर सेनापती, शौर्याचे प्रतीक होते. त्यांच्या पराक्रमाला साजेल असे स्मारक उभारण्याचा मानस आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी नांदगाव, निफाड, पिंपळगाव, येवला येथे शिवसृष्टीचे काम सुरू असून, नाशिकऐवजी आता जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी नमूद केले.
पाचाडमध्ये जिजामातांचा वाडा उभारणार
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध घटनांवर आधारित डिजिटल थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. तसेच, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे जिजामातांचा वाडा 350 वर्षांपूर्वी जसा होता तसा उभा करण्यात येणार आहे. तेथेही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. सिंदखेड राजा येथील जिजामातांचे जन्मस्थान विकसित करण्यात येणार असून, उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.