ST Bus : शिमगोत्सवासाठी कोकणात एसटीच्या ३१ जादा गाड्या धावणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. ६ मार्च ।। रत्नागिरी – कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरू झाली आहे. या सणासाठी मुंबई, पुणे तसेच नोकरी, व्यवसायासाठी परजिल्ह्यात स्थिरावलेली मंडळी आवर्जून गावी येतात. यासाठी येथील राज्य परिवहन महामंडळ विभागातर्फे शिमगोत्सवासाठी येण्यासाठी व शिमगोत्सवानंतर परतण्यासाठी दैनंदिन जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. मुंबई-पुणे मार्गावर रत्नागिरी विभागातून दैनंदिन ११० गाड्या धावतात. त्यामध्ये ३१ जादा गाड्या धावणार आहेत. गरज पडल्यास अधिक गाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे.

मंगळवारपासून (ता. ११) ग्रामदेवतेच्या पालख्यांना रूपे लागणार आहेत. त्यानंतर खऱ्या अर्थाने उत्सवाला सुरवात होणार आहे. शुक्रवारी (ता. १४) धूळवड साजरी होणार आहे. १५ पासून पालखी घरोघरी येणार आहे. ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येणार असल्यामुळे खास पालखीसाठी भाविक घरी येतात. शुक्रवारी होळीची सुट्टी असली आणि पुढील दोन दिवस सप्ताहाची अखेर अशा जोडून सुट्ट्या आल्याने गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. शिमगोत्सवासाठी गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई व उपनगरातून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चिपळूण, खेड, दापोली व गुहागर आगारातून प्रत्येकी सहा तर मंडणगड आगारातून ५, रत्नागिरी-४ तर लांजा -राजापूर आगारातून प्रत्येकी दोन मिळून एकूण ३१ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. १२ मार्चपासून जादा गाड्या धावणार आहेत. १८ मार्चपर्यंत गाड्यांचे आरक्षण प्रवाशांकडून करण्यात आले आहे; मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देणार असल्याचे रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आले.

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे सहकुटुंब येणाऱ्यांची संख्या कमी असली तरी कुटुंबातील एखाद दुसरा सदस्य मात्र आवर्जून घरी येत असल्याने जादा गाड्यांची सुविधा राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

जिल्ह्यात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. त्यामुळे मुंबई, पुण्याकडून येणाऱ्याची संख्या अधिक आहे. दैनंदिन वाहतुकीसह जादा गाड्यांचे नियोजन खास शिमगोत्सवासाठी करण्यात आले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्यांची उपलब्धता करून दिली जाणार आहे.

– प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *