महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. ८ मार्च ।। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप राजीनामा झालेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ते अकलूज येथे माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
आज अकलूज येथे भाजप आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी केला. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्यावर थेट आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चेला उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर काही तासांतच धनंजय मुंडे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगून तो राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचे जाहीर केले.
जयंत पाटील काय म्हणाले?
या पार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी सभागृहाबाहेर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. प्रत्यक्षात, सभागृहात याची माहिती दिली जाणे अपेक्षित होते. मात्र, पाच दिवस उलटून गेले तरी सभागृहाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही असे समजतो की धनंजय मुंडे यांचा अद्याप राजीनामा झालेला नाही.”
जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.