महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. ९ मार्च ।। राज्यात तापमानात प्रचंड वाढत चालले आहे. सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. उन्हाचा तडाका वाढत चालल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. उकाड्यामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. अशामध्ये हवामान खात्याने राज्यातील कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात सोलापूरमध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरमध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर निफाड येथे राज्यातील सर्वात निच्चांकी म्हणजेच ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूरपाठोपाठ रत्नागिरी, जेऊर, सांगली, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा येथे कमाल तापमान सातत्याने ३७ अंशांच्या वर गेले आहे.
पुणे, जळगाव, कोल्हापूर, निफाड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि नागपूर येथे तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. राज्यातील कमाल तापमान सतत वाढत असल्यामुळे उष्णतेच्या झळा आणखी वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
आज कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर सिंधुदुर्गात हवामान सरासरीपेक्षा उष्ण आणि दमट राहणार आहे. हवामान खात्याकडून याठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी आणि दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.