महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. ९ मार्च ।। संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून सुरेश धसांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधकांच्या मागणीनंतर उशिरा का होईना धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडावं लागलं. आता मुंडेंविरोधात सुरेश धस यांनी ईडी कारवाईचा इशारा दिलाय. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना झालेल्या घोटाळ्यांची मालिका ईडीकडे सोपवणार आहे, अस धस यांनी सांगितलंय. त्यामुळे मंत्रीपद गमावलेल्या मुंडेंच्या अडचणी आणखी वाढणार का, असा प्रश्न उपस्थित झालाय.
मुंडे आणि कराडच्या घोटाळ्याची पोलखोल करणार असल्याचा इशारा
धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता मुंडेंसमोर नवं संकट घोंगावतंय. कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करणार असल्याचं भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय. ईडीला पत्र लिहून मुंडेंच्या कार्यकाळातील घोटाळ्याची माहिती देणार असल्याचंही धसांनी सांगितलंय. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं 200 कोटींची रक्कम उचलली. कागदपत्रांच्या आधारे मुंडे आणि कराडच्या घोटाळ्याची पोलखोल करणार असल्याचा इशाराच धस यांनी दिलाय. त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. मुंडे कराडच्या घोटाळ्याच्या आरोपांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी निशाणा साधलाय. केलेल्या पापाचा हिशेब द्यावाच लागेल म्हणत जरांगेंनीही चौकशीची मागणी केलीय.
खोक्याच्या कारनाम्यांची आठवण
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मात्र यावरून सुरेश धसांना टोला लगावला. मुंडेंवर आरोप करणा-यांना सुरेश धस यांनी परांजपे यांनी सतीश भोसले ऊर्फ खोक्याच्या कारनाम्यांची आठवण करून दिलीय. शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या तक्रारीनंतर योग्य कारवाई होणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय.
धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात?
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविरोधात रान पेटवलं. वाल्मिक कराडला मुंडेंचा आशीर्वाद असल्याचे आरोप त्यांनी केले. त्यानंतर आता धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. देशमुख हत्या प्रकरणातील धसांच्या लढाईला मोठं यश आलं. देशमुख हत्या प्रकरणावरून मुंडेंना सळो की पळो करून सोडणा-या धसांनी आता ईडी चौकशीचा इशारा दिलाय. त्यामुळे मंत्रीपदावरून पायउतार झालेल्या धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.