महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १० मार्च ।। ‘मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. परंतु, तपास यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी मुंडेंसंदर्भातील तपासाला फुलस्टॉप लावायला सांगितला’, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केला.
जरांगे म्हणाले, ‘‘मुंडेंविरोधात सीआयडी, एसआयटी या दोन्ही यंत्रणांकडे ठोस पुरावे असतानाही त्यांना आरोपी ठरवले जात नाही. इतकेच नव्हे तर मुंडे यांचे मागील चार महिन्यांचे सीडीआर तपासणे गरजेचे आहे.
परंतु, या प्रकरणात जसजसे मुंडे यांचे नाव पुढे येऊ लागले तसतसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासला फुलस्टॉप लावायला सांगितले. मुंडे आणि त्यांची टोळी सरकारला अडचणीत आणेल. त्यामुळे मुंडे यांना तपासात घ्या,’’ अशी मागणीही त्यांनी केली.
मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली, तर त्यांना कोणताही त्रास होणार नाही. फक्त स्वतःच्या जातीतील लोकांना वाचवून दुसऱ्यांना गुंतवण्याचे काम करू नये, असेही ते म्हणाले.
जरांगे म्हणाले, ‘‘ २०२२-२३ मध्ये केंद्र सरकारने २६० कोटी रुपये औरंगजेबाच्या समाधीला दिले, हे त्यांचे बेगडी हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व हे छत्रपती शिवरायांच्या विचारांचे आहे. त्यामुळे राजकीय स्वार्थापोटी हिंदुत्व चालवणाऱ्यांपासून सामान्य जनतेने सावध राहावे.’’