महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १० मार्च ।। पुण्यात काँग्रेसला (Pune Congress) मोठं खिंडार पडले आहे. पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली. रवींद्र धंगेकर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना यावेळी रवींद्र धंगेकर यांनी व्यक्ती केली.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात पक्षप्रवेशाबाबत चर्चांना उधाण आलं होतं. याच चर्चांना धंगेकर यांनी पूर्णविराम दिलेला आहे. मुंबईत आज धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. धंगेकर आज सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत.
‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत यांना भेटलोय. कार्यकर्त्यांसोबत सगळ्याची चर्चा केली. आज कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार. कार्यकर्ते मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार आहे’, असे रवींद्र धंगेकर म्हणालेत.
‘सत्ता आल्याशिवाय काम होत नाही’
‘पक्ष सोडताना दु:ख होतंय. मात्र, सत्ता आल्याशिवाय काम होत नाही’, असं पत्रकार परिषदेत रविंद्र धंगेकर म्हणालेत. ‘मला एकनाथ शिंदेंकडून काहीही अपेक्षा नाही. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. मला काँग्रेसनं भरपूर दिलंय. लोकसभा आणि विधानसभेला लढण्याची संधी दिली. त्याबद्दल मी काँग्रेसचे आभार मानतो. मी पक्षाला कधी दोष दिला नाही आणि देणार नाही’, असंही धंगेकर म्हणालेत.
सुरूवातीला पुणे लोकसभा निवडणुकीत नंतर कसबा विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर रविंद्र धंगेकर हे पक्षापासून काहीसे अलिप्तच होते. अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यांनतर धंगेकर शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली होती. याच चर्चांवर त्यांनी पूर्णविराम दिलाय. आज धंगेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित पक्षप्रवेश करणार आहेत.