महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २० ऑगस्ट – : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने यंदा रस्त्याच्या कडेला पदपथांवर तसेच डेंगळे पूल येथे गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यास मनाई केली आहे. त्याऐवजी शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये 41 ठिकाणी ऍमेनिटी स्पेस आणि मोकळ्या मैदानांमध्ये साधारण 591 स्टॉल्सला परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
डेंगळे पूल किंवा शनिवारवाड्याच्या प्रांगणात वर्षानुवर्षे मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना यंदा स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या स्टॉल्सचे आज (ता.20) उद्घाटन होणार आहे. या सर्व विक्रेत्यांना महापालिकेच्या वतीने परवानगी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विक्रेत्यांकडून दहा हजार रुपये डिपॉझिट आणि दरदिवसाला 900 रुपये भाडे आकारणी करण्यात येणार असून सफाई शुल्कापोटी एक हजार रुपये आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृहनेते धीरज घाटे यांनी दिली आहे.