महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ११ मार्च ।। राज्यातील उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस उसळी घेऊ लागलाय. गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेने कहर केलाय. सोमवारी पुणे, नंदुरबार शहरांचा पारा 39.5, तर अकोला शहराचे तापमान 38.8 अंश सेल्सिअसवर गेलाय. मागील काही दिवसांपासून कमाल तापमान 35 अंशांवर असलेल्या नाशिक शहरातील तापमानाचा पारा सुद्धा वाढलाय.
सोमवारी उष्णतेची लाट चांगलीच जाणवली. पुणे, नंदुरबार, मुंबई ही शहरे चांगलीच तापली होती. मात्र, काही भागांतील कमाल तापमानात किंचित घट झाल्याची नोंद करण्यात आली. कमाल तापमानाचा पारा एक अंशाने कमी झाला होता. मात्र पुण्यासह, नंदुरबार आणि अकोला शहरांचा पारा सलग तिसर्या दिवशी सर्वाधिक ठरला. नाशिकमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला असून तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
मुंबईत उष्णतेचा कहर
सोमवारी मुंबई आणि तेथील सांताक्रुझ भागाचा पारा अनुक्रमे 36.4 आणि 37.2 अंशांवर गेला होता. त्यामुळे मुंबईकरांच्या घामाचा धारा वाहू लागल्या होता. यावर्षाच्या हंगामात मुंबईचे तापमान सलग तिसर्यांदा 36 अंशांपेक्षा जास्त वाढले आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये पारा 38 ते 40 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तविली जातेय.
नाशिक तापलं
नाशिकमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आलाय. तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून कमाल तापमान 35 अंशांवर आहे. सोमवारीदेखील 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. पुढील पाच दिवस उष्णतेची तीव्रता अधिक राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
इतर जिल्ह्यातील तापमान
सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत गुजरातमधील राजकोट येथे देशातील उच्चांकी 41.1 अंश तापमानाची नोंद झालीय. राज्यात अकोलासह सोलापूर, ब्रह्मपुरी, सांगली येथे 39 अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. जेऊर, जळगाव, परभणी, नागपूर, चंद्रपूर येथे कमाल तापमान 38 अंशांवर पोचले होते.