महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ११ मार्च ।। शिक्षण हक्क कायद्यांंतर्गत खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत सोमवारी (दि. 10) संपुष्टात आली. त्यानुसार सोमवारी रात्रीपर्यंत 64 हजार 500 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आली नसून चालू आठवड्यातच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.
यंदा राज्यातील 8 हजार 863 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशफेरी सुरू करण्यात आली. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत 64 हजार 500 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी साधारण 24 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. पुरेसा वेळ देण्यात आल्यामुळे आणखी मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी चालू आठवड्यातच प्रक्रिया सुरू केली जाणार असली तरी त्याची स्वतंत्रपणे माहिती दिली जाईल. दरम्यान, आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 11 हजार 116 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.