महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. ११ मार्च ।। पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा १ एप्रिलपासून भरणार आहे. अध्यापनाचे दिवस २२० होण्यासाठी पहिली ते नववीची परीक्षा सीबीएसईच्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. ‘सीबीएसई’च्या शाळा आता १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा अंगणवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. बालभारतीकडून सध्या युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई सुरू आहे.
राज्यात आता शाळेची घंटा १ एप्रिलपासून वाजणार आहे. नेहमी १३ जूनला भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून १ एप्रिलला भरवण्याचा निर्णय सूकाणू समितीनं घेतलाय. सीबीएसई पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली होती. नव्या शैक्षणिक वर्षासोबतच काय नेमक्या तरतूदी आहेत पाहुया.
अभ्यासक्रमात नवे बदल
तासिका ४५ मिनिटांऐवजी ५० मिनिटांच्या असतील
सीबीएसईप्रमाणेच राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात असेल
गणित आणि विज्ञान विषय सीबीएसई प्रमाणेच असेल
दहावी-बारावी बोर्ड परिक्षेची रचना बदलणार, वर्षांतून दोन परिक्षा होणार
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याची १० दिवस दफ्तराविना शाळा होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयात इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.
एक वेळापत्रक
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा मार्चअखेरीस अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळास्तरावरून घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी नसते. त्यामुळे परीक्षांचे आयोजन वर्षअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होत असतो.
प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक लागू केले जाणार आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ३री ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येत आहे.
