महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १२ मार्च ।। राज्यात सलग चौथ्या दिवशी उष्णतेच्या लाटेने कहर केला असून, मंगळवारी (दि. 11) मुंबईसह संपूर्ण राज्याचे सरासरी कमाल तापमान 38 ते 39.5 अंशांवर गेल्याने अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवत होता. आगामी तीन दिवस अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
यंदाच्या हंगामात मुंबईचे तापमान दुसर्यांदा 38, तर येथील सांताक्रूझचे 39.2 अंशांवर गेल्याने मुंबईकर उन्हात होरपळून गेले होते. मंगळवारी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, अकोला शहराचा पारा मंगळवारी 39.5, तर सांताक्रूझ, शिरूर अन् कोरेगाव पार्कचे तापमान 39.2 अंशांवर गेले होते. मुंबईचा पारा मार्च महिन्यात 32 ते 34 अंशांवर जातो. मात्र, यंदा दोनवेळा पारा 38 अंशांवर गेला होता. त्यामुळे तेथे जणू अग्निकुंड पेटल्यासारखा उकाडा जाणवत आहे.
राज्याचे कमाल तापमान
अकोला 39.5, ब—ह्मपुरी 39.4, मुंबई 38, सांताक्रूझ, पुणे (कोरेगाव पार्क, शिरूर) 39.2, जळगाव 38.4, कोल्हापूर 35.2, महाबळेश्वर 30.6, नाशिक 37.5, सातारा 36.4, सोलापूर 38.6, रत्नागिरी 39.4, डहाणू 36, धाराशिव 36.8, अमरावती 38.4, बुलडाणा 37, ब—ह्मपुरी 39.4, चंद्रपूर 38.2, नागपूर 37.6, वाशिम 37.8, वर्धा 38, यवतमाळ 34.4. अकोला 39.5, सांताक्रूझ, पुणे, शिरूर 39.2, मुंबई 38 अंशांवर
आणखी तीन दिवस प्रखर लाटेचा इशारा
मुंबईचे तापमान यंदा मार्च महिन्यात दुसर्यांदा 38 अंशांवर गेले होते. यंदा कमाल तापमानात मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मुंबई मार्चमध्ये इतकी तापत नाही, अधूनमधून एप्रिल-मेमध्ये 36 ते 38 अंशांवर पारा जातो. मात्र, यंदा तेथे मार्चमध्ये पारा इतका वर गेला.
डॉ. एस. डी. सानप, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे