महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १२ मार्च ।। अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार, अधूनमधून वेगाने वाहणार्या वार्यामुळे यंदा हापूस आंब्याचा मोहोर गळण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, यंदाच्या हंगामात आंबा कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ‘फळांचा राजा’ हापूस आंब्याला कोकणातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात मोठी मागणी आहे. यंदा हापूस आंब्याची आवक घटणार आहेच, तसेच स्थानिक बाजारपेठेतही आंबा उशिरा दाखल होणार आहे.
आंबा पीकवाढीच्या काळात किमान तापमान किमान 22 ते 25 अंश सेल्सिअस इतके असते, तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सिअस असते. यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस झाल्याने बागायतदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दरवर्षी ऑक्टोबरपासून फवारणी करावी लागते; मात्र यंदा पावसाळा लांबल्याने तसेच अवकाळीमुळे नोव्हेंबरनंतर फवारणीला सुरुवात झाली. अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतारामुळे यंदा हापूस आंबा बाजारपेठेत उशिरा दाखल होणार आहे. नैसर्गिक संकटांचा सामना शेतकरी, बागायतदारांना नेहमीच करावा लागतो. यंदा मात्र आंबा आणि काजू पिकावर मोठे नैसर्गिक संकट कोसळले आहे. मार्चमध्ये स्थानिक बाजारपेठेत हापूस आंबा दाखल होतो; मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात हापूस दाखल झालेला नाही. अवेळी पडणार्या पावसामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच तापमान अगदी 37 ते 38 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. यामुळे बर्याच ठिकाणी फळगळतीही झाली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला मोहरसुद्धा मोठ्या प्रमाणात गळला होता. पावसामुळे फवारणी करण्यास उशीर झाल्याने आंबा पीक येण्यास अनियमितता आली आहे.
हापूस आंबा झाडांची योग्य काळजी घेताना खत घालणे, साफसफाई करणे आदी मोठे कष्ट करावे लागतात; मात्र यात आंबा पिकासाठी हवामान सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आंब्याला पोषक हवामानाची गरज असते. यावर्षी तापमान चांगले वाढल्याने याचा फटका फळांना बसला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये फळगळती झाली. काही मोजक्याच बागायतदारांकडून काही पेट्या वाशी मार्केट आणि परदेशात पाठवण्यात आल्या आहेत; मात्र खर्याअर्थाने अद्यापही वाशी अथवा कोणत्याही जिल्ह्यातील हापूस आंब्याचे मार्केट गजबजले नाही. मार्चच्या अखेरपासून आंबा स्थानिक बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात होईल. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. याचे मुख्य कारण जंगलतोड, झाडांची कत्तल आहे. आपण एकीकडे देशातील दळणवळणाची व्यवस्था भक्कम करताना दुसरीकडे पर्यावरणाचा र्हासही होत आहे. मानवी विकास जलदगतीने होताना निसर्ग मात्र संकटात सापडत चालला आहे. ज्या गोष्टी नैसर्गिकरीत्या वाढत होत्या त्याला कृत्रिमतेची जोड मानवाकडून देण्यात आल्याने याचा वाईट परिणाम होत आहे. कोकणातील सर्वच आंबा बागायतदार सध्या चिंतेत आहेत; पण निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही, हे तितकेच खरे आहे. गेल्या चार पाच वर्षांत चक्री, तोक्ते, फयान यासारखी वादळे आली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत अवेळी पडणारा पावासाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षीच्या आंब्याची चव चाखण्यासाठी आणखी काही दिवस वाट बघावे लागणार आहे. 20 ते 30 टक्क्यांनी उत्पादनात घटही असणार आहे. यंदा आंबा पीक उशिरा आल्याने तो प्रक्रियेसाठीसुद्धा कॅनिंग कंपन्यांमध्येही उशिरा दाखल होईल. कोकणातील अनेक महिला बचत गटसुद्धा हापूस आंब्यांची विक्री करून लाखोंची उलाढाल करत असतात. यावेळी त्यांनाही वाट पाहावी लागणार आहे.
काजू उत्पादनातही घट : काजू पिकावरही मोठा परिणाम यावर्षी झाला आहे. ओल्या काजू गराची पहिल्या टप्प्यात विक्री सुरू असून, दरही 1600 ते 2000 रुपये किलो आहेत. आंब्याप्रमाणेच काजूलाही उशिरा मोहर आला. फवारणी नोव्हेंबरमध्ये करण्यात आली. त्यामुळे त्याला पालवीसुद्धा उशिरा आली. त्यात अवेळी पावसामुळे फूलकीड लागल्याने काजू उत्पादनातही यावेळी घट झाली आहे.