महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ मार्च ।। सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेचा इशारा चुकला असून बुधवारीही मुंबईतील दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा पाच अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. बुधवारसाठीही प्रादेशिक हवामान विभागाने उष्ण आणि आर्द्रतापूर्ण वातावरणाचा अंदाज दिला होता. मात्र मंगळवार बुधवारी उन्हे तापू लागल्यानंतर मुंबई आणि परिसरासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा अद्ययावत करण्यात आला. मंगळवारीही अशाच पद्धतीने इशारा सकाळी अद्ययावत करण्यात आला होता. उन्हे तापल्यानंतर, लोक घराबाहेर पडल्यानंतर हे इशारे मिळत असल्याने ते वेळेत का दिले जात नाहीत, असा प्रश्न विचारला गेला आहे.
बुधवारी सांताक्रूझ येथे ३८.६ तर कुलाबा येथे ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे सरासरीपेक्षा ५.५ अंशांनी तर सांताक्रूझ येथे सरासरीपेक्षा ५.७ अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. मंगळवारच्या इशाऱ्यानुसार बुधवारी मुंबईमध्ये उष्ण आणि आर्द्रतायुक्त वातावरणाची शक्यता होती. मात्र पूर्वेकडून येणारे वारे आणि मुंबईजवळची प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती यामुळे बुधवारीही वातावरणाचा ताप अधिक जाणवत होता.
इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, तांत्रिक बिघाड झाल्याने रायपूरला जाणारे विमान चिकलठाण्यात लँड
सकाळच्या वेळीही फारसा तापमान दिलासा मुंबईत मिळाला नाही. वाढलेल्या आर्द्रतेमुळे अधिक अस्वस्थता होती. मुंबईमध्ये सकाळच्या वेळी कुलाबा येथे ७४ टक्के आर्द्रता होती तर सांताक्रूझ येथे ५८ टक्के आर्द्रता होती. मुंबईचे किमान तापमानही सरासरीपेक्षा चढे असून कुलाबा येथे २५ तर सांताक्रूझ येथे २३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गुरुवारपासून कमाल तापमान हळुहळू खाली उतरू लागेल. मात्र यामध्ये आर्द्रता वाढत गेल्याने अस्वस्थता वाढू लागेल असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुसरीकडे पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, जळगाव, भुसावळ या शहरांमध्येची उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याचे बघायला मिळाले. कोकणातही उष्णेतेची लाट निर्माण झाली होती. मार्च महिन्यातच सूर्य तापताना दिसतोय. काही शहरांमध्ये तर तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान गेल्याचे बघायला मिळाले.