महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ मार्च ।। पुण्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी खास ठरणार आहे. 14 मार्च 2025 रोजी देशभर होळीचा सण साजरा केला जाणार आहे. ज्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या राज्यात आज १३ मार्चला होळीचा सण साजरा होईल, तर १४ मार्चला धुळवड सण आयोजित केला जाईल. कोकणात शिमग्याची धूम सुरू झाली आहे. अशातच शुक्रवारी धुळवडीच्या सणानिमित्त पुणे मेट्रो सेवा विशिष्ट कालावधीसाठी बंद राहील. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रोकडून याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणेकर मेट्रो प्रवाशांसाठी…
धुळवड सणानिमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवा शुक्रवार, दिनांक १४ मार्च २०२५ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत बंद असणार आहे. तसेच दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरु असेल.#Pune #Metro@metrorailpune
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 12, 2025
मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी धुळवड सणाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत बंद राहील. दुपारी ३.०० वाजल्यापासून ते रात्री ११.०० वाजेपर्यंत मेट्रो सेवा पुन्हा नियमित सुरू होईल. पुण्यात सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मार्ग सुरू आहेत. धुळवड सणानिमित्त स्वच्छता आणि सुरक्षा कारणांमुळे ही सेवा बंद ठेवली जात आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी केली जात असल्याने मेट्रोच्या स्वच्छता आणि सुरक्षा कारणास्तव ही सेवा बंद ठेवली जाईल. यापूर्वी महामेट्रोकडून धुळवडीसह रंगपंचमीला आणि दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशीही काही कालावधीसाठी मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. हे पावले सुरक्षितता आणि सुविधांच्या दृष्टीने घेण्यात येतात.