पालकांबरोबरच शाळांचंही टेन्शन वाढणार ? यंदा शाळांचे वर्षिक वेळापत्रक कोलमडण्याची भीती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. १३ मार्च ।। शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानक पहिल्या इयत्तेपासून नवव्या इयत्तेपर्यंतची वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याची सूचना जारी केली. मात्र या सुचनेमुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच व्हाव्यात, अशी शिक्षकांसह पालकांची मागणी आहे. त्यातच आता मुंबईतील शाळांमधील मुख्याध्यापकांसमोर या निर्णयामुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. आताच्या नव्या सुचनेप्रमाणे परीक्षा संपवून नवीन शैक्षणिक वर्षातील दहावीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडलाय.

वार्षिक परीक्षाच 22 एप्रिलपर्यंत
अनेक शाळांमध्ये इयत्ता दहावीचे वर्ग एप्रिल महिन्यातच घेण्यास सुरु होतात. सामान्यप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी दहावीच्या मुलांचे वर्ग सुरु होतात. याच काळात दहावीच्या मुलांचा बराचसा अभ्यासक्रमही पूर्ण करतात. मात्र आता नव्या सुचनेनुसार वार्षिक परीक्षाच 22 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून त्यामुळे दहावीच्या या वर्गांचे नियोजन आता करता येणार नाही, अशी खंत शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांना उजळणीला वेळ कसा मिळणार?
मार्चमध्ये परीक्षा आटोपल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा एप्रिलमध्ये पहिल्या पंधरा दिवसांमध्ये काही अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. जूनमध्ये पुढील अभ्यासक्रम सुरू करून वर्षाच्या शेवटी उजळणीसाठी वेळ मिळतो. मात्र यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा दहा दिवस आधीच घेतल्या जात असल्यामुळे पुढील वर्षी देखील या वाया गेलेल्या दिवसांचा फटका बसणार आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. एप्रिलमध्ये दहावीचे एक्स्ट्रा लेक्चर घेण्याचे नियोजन यंदा फसणार आहे. साहजिकच दहावीचा अभ्यास फेब्रुवारीत परीक्षेआधी संपवायचा कसा, असा पेच निर्माण झाला आहे. या दिवशी सर्व शाळांतील परीक्षा संपणार आहेत.

चार ते पाच दिवसात निकाल कसा लावायचा?
सर्व इयत्तांच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल अवघ्या पाच दिवसात देणे सर्वच शाळांना अवघड ठरणार आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याच्या धोरणाबाबत प्रशासनाने पुनर्विचार विचार करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

परीक्षा उशिरा घेण्याच्या निर्देशांमुळे शाळांचे वर्षभराचे नियोजन गडबडले आहे. हा निर्णय पुढील वर्षीपासून अंमलात आणावा, अशी मागणी उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेकडून केली जात आहे. 23 एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर आठवड्याभरात म्हणजेच 1 मेपासून सुट्टी द्यायची असेल तर चार ते पाच दिवसांमध्ये पेपर तपासणी करुन निकाल विद्यार्थ्यांच्या हातात देणे अतिशय अवघड काम असल्यानेच प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं मुख्यध्यापकांच्या संघटनेचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *