Video : अजूनही तोच जलवा ! ‘सिक्सर किंग’ युवराजने ७ चेंडूत केल्या ४२ धावा!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. १४ मार्च ।। इंटरनॅशनल मास्टर्स लीग टी२० चा पहिला सेमीफायनल सामना इंडिया मास्टर्स आणि ऑस्ट्रेलिया मास्टर्स या संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात इंडिया मास्टर्स संघाने एकतर्फी विजय मिळवला. सामन्यादरम्यान, टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगची (Yuvraj Singh) एक स्फोटक खेळी पाहायला मिळाली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या युवराजने या सामन्यात आपला जुना फॉर्म दाखवत विरोधी गोलंदाजांना धुडकावून लावले.

सामन्याच्या सुरुवातीला, युवराजने कोणत्याही प्रकारचा दबाव न अनुभवता चौकार आणि षटकारांची झंझावात खेळी केली. त्याची फलंदाजीची शैली चाहत्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरली. युवराजने आपल्या फलंदाजीने अनुभवी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना इतके कुटले की त्यांना विकेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याच्या खेळीमुळे संघ मजबूत स्थितीत आला आणि उपांत्य फेरीत विजयाचा मार्ग मोकळा झाला. युवराजसोबत त्याच्या संघातील खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली, पण युवराजच्या कामगिरीची सर्वाधिक चर्चा झाली.

या सामन्यात युवराज सिंगने १९६.६७ च्या स्ट्राईक रेटने ३० चेंडूत ५९ धावा केल्या, ज्यामध्ये १ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. म्हणजेच, त्याच्या डावात त्याने फक्त षटकारांसह ४२ धावा केल्या. या लीगमध्ये युवी याच शैलीत फलंदाजी करत आहे. त्याने ५ सामन्यांच्या ४ डावात १९३.०२ च्या स्ट्राईक रेटने आणि १६६.०० च्या सरासरीने १६६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १३ चौकार आणि १३ षटकारांचा समावेश आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंडिया मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २२० धावा केल्या. यादरम्यान सचिन तेंडुलकरनेही ३० चेंडूत ४२ धावांची कर्णधारपदाची खेळी खेळली. तर, युसूफ पठाणने १० चेंडूत २३ धावा केल्या. इरफान पठाणने ७ चेंडूत १९ धावा काढत नाबाद राहिला. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १८.१ षटकात १२६ धावांवर सर्वबाद झाला. या काळात शाहबाज नदीमने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *