“संतोष देशमुख प्रकरणाची सर्वांनी मिळून विल्हेवाट लावली” Manoj Jarange यांचा खळबळजनक दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. १४ मार्च ।। ‘संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. पुरवणी जबाबात धनंजय मुंडे सहआरोपी होतील. अन्यथा, सरकार संशयाच्या भोवऱ्यात येईल. राजकारणी वेगवेगळे डाव खेळत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सर्वांनी मिळून विल्हेवाट लावली आहे. या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी नेते एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढत आहेत,’ असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पहिली न्यायालयीन सुनावणी बुधवारी झाली आहे. बीड जिल्ह्यातील विविध भागांतील मारहाणीच्या घटनांचे व्हिडिओ चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी शहरात गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘तीन महिन्यानंतरही फरारी आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाही. देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रशासन जाणूनबुजून असे प्रकार करीत आहे. तीन महिन्यांत एकही सहआरोपी केला नाही. साध्या अपघातात एखाद्याने मदत केली असली तरी पोलिस सहआरोपी करतात. इथे खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपींना अनेकांनी राहायला घरे दिली, पैसे दिले, पोलिसांनी कायदेशीर पळवाट सांगितली. तरीसुद्धा त्यांना सहआरोपी केले नाही. जनतेला सगळे कळत आहे,’ असे जरांगे म्हणाले.

‘सरकार आणि पोलिस यंत्रणा तपासात भेदभाव करीत आहेत. देशमुख यांचे आरोपी सापडत नाहीत आणि इतर आरोपी सापडतात, हे कसे मान्य करावे? नेत्यांचा कार्यकर्ता, पाहुणा, बिल्डर, भ्रष्टाचारी यांना सूट दिली जाते. भ्रष्टाचाऱ्यांना पार्टनर करणारे सरकार सत्तेत आहे. मी कोणत्याही मारहाणीचे समर्थन करीत नाही. पण, देशमुख हत्या प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी व्हिडिओ बाहेर काढले जात आहेत. राजकीय डाव खेळून नेते देशमुख हत्या प्रकरणाचे गांभीर्य घालवत आहेत,’ अशी टीका जरांगे यांनी केली.

‘राजकारणी लोक सामाजिक प्रकरणात घुसले की ती प्रकरणे हाताळताना आम्हाला अडचणी येतात. देशमुख हत्या प्रकरणात सगळे नेते एकमेकांसोबत उठले, बसले आहेत. काही गोष्टी आतून शिजलेल्या आहेत. त्यात सामाजिक प्रकरणाचे वाटोळे होत आहे,’ अशी खंत जरांगे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *