महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. १६ मार्च ।। चॅम्पियन्स ट्रॉफीमधील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यातील टी२० मालिकेला रविवारपासून (१६ मार्च) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने ५९ चेंडू आणि ९ विकेट्स राखून विजय मिळवला.
या मालिकेत पाकिस्तान संघ सलमान आघा या नव्या कर्णधारासह खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तसेच बाबर आझम, मोहम्मद रिझवान या अनुभवी खेळाडूंना टी२० संघातून वगळण्यात आले आहे, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.
तसेच या मालिकेसाठी न्यूझीलंडने त्यांच्या अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यांच्या संघाचे नेतृत्व अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मायकल ब्रेसवेल करत आहे.
ख्राईस्टचर्चला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडसमोर अवघ्या ९२ धावांचे लक्ष्य ठेवता आले होते. काईल जेमिसन आणि जेकॉब डफी यांच्या माऱ्यासमोर पाकिस्तान संघ संघर्ष करताना दिसला. ९२ धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग न्यूझीलंडने १०.१ षटकात म्हणजेच ६१ चेंडूत पूर्ण केला.
न्यूझीलंडकडून सलामीवीर टीम सिफर्ट आणि फिल ऍलेन यांनीच ६ षटकांच्या आत ५३ धावांची भागीदारी केली. ६ व्या षटकात सिफर्टला अब्रार अहमदने २९ चेंडूत ४४ धावांवर बाद केले.
पण त्यानंतर टीम रॉबिसन याने ऍलेनला चांगली साथ देली. या दोघांनी उर्वरित ३९ धावा पूर्ण केल्या आणि न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. फिन ऍलेन याने नाबाद २९ धावा केल्या, तर टीम रॉबिसनने नाबाद १८ धावा केल्या.
तत्पुर्वी, पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद हॅरिस आणि हसन नवाझ शून्यावर बाद झाले होते. तसेच त्यांच्याकडून फक्त खुशदील शाहने ३० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने ३० चेंडूत ३२ धावा केल्या.
त्याच्याशिवाय सलमान आघा (१८) आणि जहांदद खान (१७) यांनीच दोन आकडी धावसंख्या केली. बाकी कोणीही १० धावांचा टप्पाही पार करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा संघ १८.४ षटकातच ९१ धावांवर सर्वबाद झाला.
न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना जेकॉब डफीने ३.४ षटकात १४ धावा खर्च करत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच काईल जेमिसनने सर्वोत्तम गोलंदाजी करताना ४ षटके गोलंदाजी ८ धावाच खर्च करत ३ विकेट्स घेतल्या, तर ईश सोधीने २ विकेट्स घेतल्या आणि झाकरी फॉल्क्सने १ विकेट घेतली.