महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रवीवार दि. १६ मार्च ।। महाराष्ट्रात सध्या मध्ययुगीन काळातील छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित इतिहास आणि मुघल शासकांवरील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचीही भर पडली आहे. पक्षाच्या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, यापुढे फोनवर बोलताना हॅलो ऐवजी ‘जय शिवराय’ असे म्हणावे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ही संकल्पना असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगली येथे पार पडलेल्या मेळाव्यात बोलताना म्हटले.
सांगलीतील मेळाव्यात बोलत असताना शशिकांत शिंदे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार यापुढे फोनवरून बोलत असताना हॅलो ऐवजी ‘जय शिवराय’ असे संबोधन करून पुढील संभाषण सुरू करावे. यावेळी मंचावर जयंत पाटील यांच्यासह हर्षवर्धन पाटील, रोहित पाटील अशा नेत्यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विशद करत असताना शशिकांत शिंदे म्हणाले, आपला पक्ष छत्रपतींच्या विचारांना माननारा पक्ष आहे. काही लोक शिवाजी महाराजांना आपल्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपण शिवरायांच्या विचारांचे खरे पाईक आहोत. त्यामुळेच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की, यापुढे फोनवर संभाषणांची सुरूवात करताना जय शिवराय म्हणावे. सांगलीपासून सुरू केलेला हा उपक्रम आपण राज्यभरात नेऊ.
जय शिवराय🙏 pic.twitter.com/J9NMAYv0pB
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 16, 2025
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीहीह ‘जय शिवराय’ असे पोस्टर एक्स अकाऊंटवर शेअर करून या अभियानाची सुरुवात केल्याचे सुतोवाच दिले. पक्षातील आतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगण्यासाठी पक्षाकडून विचारपूर्वक हे पाऊल उचलण्यात आले आहे. हिंदुत्त्ववादी विचारांच्या पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला या विषयावरून अनेकदा लक्ष्य करण्यात आलेले आहे.
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, भाजपाचे नेते, मंत्री यांनी अलीकडे केलेल्या टिप्पण्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या होत्या. आम्ही हे विकृतीकरण सहन करणार नाही. जय शिवराय, ही घोषणा देऊन आम्ही छत्रपतींच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून देत आहोत.