महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १७ मार्च ।। वाहनांना फास्टॅग लावण्याच्या सक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फास्टॅग सक्तीच्या अंमलबजावणीला गती दिली आहे. राज्यातील सर्व टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून प्रत्येक वाहनाला फास्टॅग बंधनकारक असेल. वाहनांना जर फास्टॅग नसेल तर वाहनधारकांना टोलचे दुप्पट पैसे भरावे लागणार आहेत. राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. त्या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीद्वारे चालवण्यात येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग किंवा ई-टॅगद्वारे पैसे भरणे बंधनकारक असणार आहे. रोख रक्कम, कार्ड आणि यूपीआयद्वारे टोल भरणाऱया वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. एमएसआरडीसी मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर टोल संकलन करते. दहिसर, मुलुंड पश्चिम, मुलुंड पूर्व, ऐरोली आणि वाशी या टोलनाक्यांसह शहरातील इतर टोल केंद्रांवर एमएसआरडीसी 1 एप्रिलपासून फास्टॅगसक्तीची काटेकोर अंमलबजावणी करणार आहे.