महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. १८ मार्च ।। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत गेल्या सोमवारी संपुष्टात आली. त्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया आज मंगळवार (दि.18) पासून सुरू करण्यात येणार असून, येत्या 24 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.
आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील 8 हजार 863 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 152 अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर 10 मार्चपर्यंत 69 हजार 604 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश 18 मार्चपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठवला जाणार आहे.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रिक्त जागांनुसारच एसएमएस पाठवण्यात येईल. परंतु, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती पाहणे आवश्यक आहे.
पालकांनी प्रवेश मिळालेल्या पत्राची प्रत आणि आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून 24 मार्चपर्यंत कागदपत्रांची तपासणी करून ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.