नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. १८ मार्च ।। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबची कबर हटवण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन गटात संघर्ष पेटला. जवळपास चार तास महाल परिसर, चिटणीस पार्क परिसर यासह अन्य ठिकाणी तुफान दगडफेक, तोडफोड, रस्त्यावर जाळपोळ आणि नारेबाजी करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पोलिसांना अश्रु धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तर लाठीमार सुद्धा करावा लागला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची असामाजिक तत्त्वांची धरपकड सुरू होती. परिस्थिती नियंत्रणा बाहेर असल्याचे लक्षात येतात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी शहरातील काही भागात संचारबंदीचे आदेश लागू केले.

महाल परिसरात काल उसळलेल्या दंगलसदृश्य परिस्थितीचे पडसाद आज शहरभर उमटले. शहरातील संवेदनशील भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी सशस्त्र जवानांना बंदोबस्तासाठी तैनात करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र सोमवारी रात्री अनेक गाड्यांची तोडफोड अनेक गाड्यांना आग लावणे किंवा दुकानावर दगडफेक करणे या प्रकारामुळे शहरातली परिस्थिती हाताबाहेर गेली असून पोलीस मोठ्या प्रमाणात संवेदनशील भागात तैनात करण्यात आले आहेत.

नागपुरात कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी रात्री (१७ मार्च) मोठा तणाव निर्माण झाला. दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेमुळे नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत अधिसूचनेतून समोर आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारंबदी लागू करण्यात आली आहे. तसंच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रभावित भागातील रस्ते बंद करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणारा कोणीही भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत दंडनीय राहील.

परिस्थिती आता नियंत्रणात आहे. सध्या परिस्थिती शांत आहे. एक फोटो जाळण्यात आला, त्यानंतर लोक जमले. या गर्दीला पांगवण्याचा आम्ही प्रयत्न केला. या संदर्भात आम्ही कारवाईही केली. आरोपींवर कारवाई केली जाईल.”- डॉ रवींद्र कुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *