महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. १९ मार्च ।। ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट’ (HSRP Number Plate) बसविण्यासाठी एप्रिल २०२५ अखेर मुदत देण्यात आली आहे. पण, अनेक नागरिकांना ‘सुरक्षा नंबर प्लेट’ बसविण्यासाठी मे महिन्यातील तारखा दिल्या जात आहेत. त्यामुळे दंड भरावा लागणार अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, ‘सुरक्षा नंबर प्लेट’ बसविण्यामधील गोंधळ सुरूच आहे. नंबर प्लेट बसविण्याचे काम घेतलेल्या कंपनीकडून सुरू असलेल्या संथ कामाचा फटका (Pune News) नागरिकांना सहन करावा लागत आहे.
अंतिम मुदत काय?
एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट’ लावणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, राज्यात वाहनांना नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ ही देण्यात आली आहे.
दोन लाखांच्या पुढे नोंदणी
पुणे शहरातच सर्व प्रकारच्या २५ लाख वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. आतापर्यंत दोन लाखांच्या पुढे वाहनांसाठी सुरक्षा नंबर प्लेट नोंदणी झाली आहे. सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याची गती खूपच संथ आहे. आरटीओने नंबर प्लेट बसविण्यासाठीची केंद्रे वाढविण्याची सूचना केली आहे; पण, त्याचा अद्याप तरी म्हणावी अशी अंमलबजावणी झालेली दिसत नाही.
गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा नंबर प्लेटबाबत गोंधळाचे वातावरण सुरू आहे. काही ठिकाणी नोंदणी केलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट वेळेत आल्या नाहीत, तर काही सेंटर अचानक बंद झाली. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
सुरक्षा नंबरप्लेट ऑनलाइन बुकिंग करताना काही वेळा अडचणी येत होत्या. त्यावरून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ३० एप्रिलची दिलेली मुदत जवळ आल्यामुळे सुरक्षानंबर प्लेटसाठी बुकिंग वाढले आहे. दिवसाला पाच ते सहा हजार बुकिंग होऊ लागले आहे. परंतु, या नंबर प्लेट बसविण्याची केंद्रे कमी असल्याने काम संथ गतीने सुरू आहे.
शुल्क किती?
दुचाकी आणि ट्रॅक्टर : ४५० रुपये आणि जीएसटी
तीनचाकी वाहने : ५०० रुपये आणि जीएसटी
चारचाकी आणि इतर वाहने : ७४५ रुपये आणि जीएसटी