Video : हिंजवडीतील अपघात नसून घातपातच, CCTV फुटेज समोर, नेमकं काय घडलं?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ मार्च ।। जनार्दन हंबर्डीकर याला भाजल्यामुळे झालेल्या जखमा आणि तो दाखवत असलेल्या वेदना यात तफावत दिसत होती. किरकोळ जखमी होऊनही तो वारंवार शुद्ध हरपल्याचे नाटक करीत होता, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या लक्षात आले. पोलिसांच्या चौकशीतही तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. घटनास्थळाजवळील एका कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये चालक गाडीच्या सीट खाली काहीतरी पेटवत असल्याचे पुसटसे दिसले होते. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला बुधवारी लागलेली आग हा अपघात नसून, घातपात होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांबरोबरील वाद आणि पगारवाढ न झाल्याच्या रागातून बसचालकाने स्वत:च बस पेटवून दिली. तशी कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे.

चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला या माहितीमुळे धक्कादायक वळण मिळाले आहे. जनार्दन हंबर्डीकर (वय ५६, रा. कोथरूड) असे आरोपी चालकाचे नाव आहे. तो व्योम ग्राफिक्सच्या बसवर चालक आहे. बुधवारी सकाळी सकाळी साडेआठ वाजता हिंजवडीतील विप्रो सर्कल फेज एकच्या परिसरात अचानक या बसला आग लागली. त्यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर, सहा कामागार गंभीर भाजले. चार कर्मचाऱ्यांनी गाडीतून उड्या मारून जीव वाचविला. वाहनात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. मात्र, तपासात हंबर्डीकर यानेच जुन्या वादातून आणि कंपनी प्रशासनाच्या नाराजीतून हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.

अपमानास्पद वागणूक
आरोपी चालक जनार्दन हंबर्डीकर याला कंपनीतील इतर कर्मचारी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन दिवसांपूर्वी त्याला डब्यातील चपातीही खाऊ दिली नाही. दिवाळीत त्याचा पगार कापला होता. हा सर्व राग आणि खुन्नस डोक्यात असल्याने हा गुन्हा केला, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.

ज्यांच्यावर राग ते वाचले…
गाडीत बसलेल्या तीन लोकांवर आरोपी चालकाचा राग होता. त्यांना इजा पोहचविण्यासाठी त्याने हा प्रकार केला. त्याला कंपनीच्या जवळ किंवा आवारातच गाडी पेटवायची होती. मात्र, पळता येईल अशी जागा पाहून त्याने आग लावली. ज्या तिघांवर त्याचा राग होता, ते सुखरूप वाचले आहेत. तर, ज्यांचा या सर्व गोष्टींशी एवढा संबंध नव्हता असे चार लोक या घटनेत होरपळून मृत्यू पावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *