Ladki Bahin Yojana:’या’ लाडक्या बहिणींना मिळणार वाढीव मदत; अजित पवाराचं मोठं वक्तव्य म्हणाले ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २१ मार्च ।। ‘सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल’, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या मदतीसाठी आता दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

लॉटरीच्या माध्यमातून राज्याचे उत्पन्न वाढावे यासाठी विधानसभा सदस्यांची समिती नेमण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली. विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या गुरुवारी मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ, असे त्यांनी सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेत भाग घेताना राज्य सरकारने लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवावे, अशी सूचना केली होती. त्यासाठी त्यांनी केरळसह अन्य राज्यांना लॉटरीपासून मिळणाऱ्या महसुलाची माहिती दिली. या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी आपल्या उत्तरात सर्व प्रकारच्या लॉटरीच्या माध्यमातून राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची समिती नेमण्याची घोषणा केली. या समितीने अभ्यास करून महिनाभरात अहवाल द्यावा, असे पवार म्हणाले.

‘आर्थिक शिस्त लावायची आहे’
सध्या राज्याचे स्थूल उत्पन्न ४९ लाख ३९ हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे सरकारची महसुली तूट ही १ टक्क्यांच्या आत आहे. २०१५ मध्ये राज्याचे स्थूल उत्पन्न १२ लाख ८० हजार कोटी रुपये असतानाही महसुली तूट १ टक्क्याच्या आत होती. तथापि २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०० टक्के महसूल जमा करून राज्याला आर्थिक शिस्त लावायची असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ७७. २६ टक्के खर्च झाल्याचे सांगत पवार यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांचा ४० टक्के खर्च झाल्याचा दावा खोडून काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *