KKR vs RCB: IPLच्या १८ वर्षांच्या इतिहासात ‘ही’ कागमिरी करणारा एकमेव फलंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. २३ मार्च ।। आयपीएल २०२५चा सलामीच्या सामन्यात चेस मास्टर विराट कोहलीने नाबाद परतत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. आरसीबी वि. केकेआर या दोन्ही संघांमध्ये एक अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अखेरीस आरसीबीने केकेआरवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने १६.२ षटकांत ३ विकेट्स गमावत महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने चांगली फटकेबाजी केली पण आरसीबीने ज्या पद्धतीने सामन्यात पुनरागमन केलं ते पाहण्यासारखं होतं. यादरम्यान लक्ष्याचा पाठलाग करतान विराट कोहलीने मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.

केकेआरने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावत १७५ धावा केल्या. सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर केकेआरने वादळी सुरूवात केली. पण संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरला. आरसीबीचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत केकेआरला १७५ धावांवर रोखण्यात यशस्वी ठरले. याशिवाय केकेआरने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी धुव्वादार सुरूवात करून दिली. विराट कोहलीने ३१ चेंडूंत ४ षटकार आणि ३ चौकारांसह अर्धशतकी खेळी पूर्ण केली. यादरम्यान विराट कोहलीने आयपीएल इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो आजवर कोणत्याच खेळाडूला जमलेला नाही.

विराट कोहलीने केकेआरविरूद्ध सामन्यात ३८ धावा करत आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध १००० धावा पूर्ण केल्या. यासह विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात चौथ्या संघाविरूद्ध १००० धावांचा टप्पा गाठला आहे. त्याच्याशिवाय कोणत्याच फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांविरूद्ध ही कामगिरी केली आहे. विराटशिवाय वॉर्नर आणि रोहित शर्मा यांनी २-२ संघांविरूद्ध १००० धावांचा टप्पा गाठला आहे.

आयपीएलमधील विविध संघांविरूद्ध १००० धावा पूर्ण करणारे फलंदाज

विराट कोहली – CSK, DC, KKR, PBKS
डेव्हिड वॉर्नर – KKR, PBKS
रोहित शर्मा – KKR, DC
शिखर धवन – CSK

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *